नाशिक : पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यंदा पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने नदीपात्रालगतच्या गावांना धोक्याचा इशारा देण्याबरोबरच पोलीस, महसूल, वीज, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य या खात्याना आगाऊ माहिती द्यावी तसेच नदी, नाल्याच्या पूररेषेत राहणाऱ्यांना आत्तापासूनच सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी तहसीलदार व प्रांत अधिकाºयांना सांगण्यात आले. पावसाळ्यात प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती होण्याची अधिक शक्यता असते अशावेळी जीवितहानी टाळण्यासाठी सर्वच यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून एकमेकांशी समन्वय साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा साठा करून ठेवण्याचे, तर पुरवठा विभागाने पावसाळ्यात संपर्क खंडित होणाºया गावांसाठी पुरेसे अन्नधान्य पावसाळ्यापूर्वी पोहोचविण्याचेही ठरविण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या २१६ मध्य रेजिमेंटचे मेजर राजेश सोनवाल यांनीही मार्गदर्शन केले. पूरग्रस्तांसाठी प्रशासनाच्या समन्वयाने सैन्यदल मदत कार्यासाठी पूरप्रवण भागाची पाहणी करून पूर्वतयारी करेल त्यासाठी लष्कराच्या देवळाली छावणी येथे अत्यावश्यक कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे सोनवाल यांनी सांगितले. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तपशिलवार सादरीकरण करण्यात आले. पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती, वीज पडून होणाºया दुर्घटना, दरड कोसळणे या घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच जास्त पाऊस होणाºया इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाग, दिंडोरी, कळवण, पेठ या भागांतील माहितीही सादर केली. बैठकीस सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख हजर होते.जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने महापालिका, तालुका, प्रशासन, पोलीस आदींनी आपत्तीला सामोरे जाण्यासाठी साधन सामग्रीची सज्जता करणे गरजेचे आहे. लाइफजॅकेट, बोटी, फ्लड लाइट आदी साहित्यांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे तसेच जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी विभागांनी तसेच तालुका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:18 AM