अझहर शेख
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा दणका देत आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता संशयित दिनेश बुधा बागुल (५०) यास २८ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि.२५) नाशिक शहरातील तिडके कॉलनीतील अनमोल नयनतारा नावाच्या अपार्टमेंटमध्ये पथकाने सापळा रचला. दरम्यान, नाशिक जिल्ह्यासह या कारवाईने एकच खळबळ उडाली असून आदिवासी विकास आयुक्तालयातील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
नाशिकमध्ये असलेले राज्याचे आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बांधकाम विभागात कार्यरत बागुल यांनी एका ठेकेदाराकडे अडीच कोटीचे काम मंजुर करण्यासाठी १२टक्के इतक्या दराने लाचेची मागणी केली होती. यानुसार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक नारायण न्याहाळदे, सतीश भामरे यांनी पथकाला या तक्रारीची पडताळणी करत संशयित बागुलवर पाळत ठेवण्यास सांगितले. आठवडाभरापासून याप्रकरणी पथक त्याच्यावर गोपनीयरित्या ‘वॉच’ ठेवून होते. गुरुवारी मुंबईतून नाशिकला परतल्यानंतर बागुल याने तक्रारदार ठेकेदाराकडून नयनतारा अपार्टमेंटमध्ये लाचेची रक्कम स्वीकारली असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडाकेबाज कारवाईने जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. बागुल यांच्या नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील घरांचीही झडती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लागोपाठ दोन मोठे अधिकारी जाळ्यातनाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अ श्रेणीतील भ्रष्ट अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. बुधवारी पथकाने आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन लांजेवार यांनाही लाचेची रक्कम घेताना अटक केली. तसेच गुरुवारी संशयित दिनेश बागुल यास त्याच्या राहत्या घरात ताब्यात घेतले.