नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रथम सत्राचा निकाल शुक्रवारी (दि.२१) जाहीर झाला आहे. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शैक्षणिक वर्षाच्या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्पष्टीकरण महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
कोरोना महामारीमुळे केजी टू पीजी पर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या महाविद्यालयीन परीक्षा विलंबाने होत असून एप्रिल महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन स्वरूपात विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठाने घेतली. या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडल्या नंतर बुधवारी (दि. २१) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात अंतर्गत गुण नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यासंदर्भात महाविद्यालयाकडे अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क साधला. मात्र विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा झाल्यानंतर एकत्रित निकाल पत्रकात या गुणांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.