नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २००६ ते २००९ या काळात ११ गावतळे आणि २ सिमेंट प्लग बंधाऱ्यांच्या सुमारे ८० लाखांच्या कामांचे बनावट शिफारस पत्र आणून जिल्हा परिषदेची व पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्णात पोलिसांनी संबंधित संशयितांचे हस्ताक्षर नमुने जिल्हा परिषदेकडे मागविल्याने खळबळ उडाली आहे. १८ मार्च २०१३ रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात या ८० लाखांच्या फसवणूक प्रकरणी तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता तुकाराम त्र्यंबक पाटील यांनी फिर्याद दाखल करून १५ जणांविरोधात तक्रार दिल्याने भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अकरा जणांमध्ये २००६ ते २००९ च्या काळात तत्कालीन कार्यकारी अभियंता असलेले एस.आर. तेजाळे, सहायक लेखा अधिकारी श्रीमती एस. एल. वाघ, कनिष्ठ सहायक पी. ए. महाजन, एस. एस. बच्छाव, वरिष्ठ सहायक आर. पी. अहिरे यांच्यासह सुशिक्षित बेरोजगार अभियंता संतोष प्रेमसुखजी आसावा, संजय भास्कर टिळे, मनोज अशोक पलोड, बाळासाहेब शंकरराव सानप, प्रमोद सुभाष थोरात, तृप्ती अशोकराव गवळी, अशोक निवृत्ती ताटे, रवींद्र विठ्ठलराव धनाईत, दत्तू सुनील भोर व कृष्णराव रामराव गुंड यांच्या विरोधात भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१-३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव ऊर्फ रामराम गुंड यांच्यावर गडदुणे व धुरापाडा या दोन १३ लाखांच्या सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे बनावट शिफारस पत्र आणल्याचा आरोप आहे. तसेच उर्वरित तत्कालीन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व अन्य चौघांसह एकूण ११ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांची याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता संबंधित त्यावेळचे पाचही अधिकारी व कर्मचारी तसेच ११ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या स्वाक्षऱ्यांचे नमुने १३ जुलैला जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मागविले आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने हे नमुने तत्काळ पाठविण्याची तयारी केली आहे. हे सर्व प्रकरण उघड करण्यात रामचंद्र हेलाडे यांच्यासह जिल्हा परिषदेचेच एक कर्मचारी असलेले किरण सपकाळे यांनी थेट लोकायुक्तापर्यंत पाठपुरावा केल्यानेच जिल्हा परिषदेला याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा लागल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
पाच अधिकाऱ्यांसह अभियंते अडचणीत
By admin | Published: July 17, 2016 1:26 AM