नाशिक : खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीपासून पुढील वर्ग सुरू केले खरे; परंतु विनाअनुदानित शाळा टिकणे कठीण असल्याने अखेरीस महापालिकेने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीनशे मुलांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना सेमीमध्ये सामावून घेण्याचे ठरविण्यात आले आहे.महापालिकेच्या पूर्वी १२८ मराठी अनुदानित शाळा होत्या. मात्र विद्यार्थ्यांची गळती सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. समाजातील मध्यमवर्गीय तसेच निम्नस्तरावरही महापालिकेच्या शाळांऐवजी खासगी इंग्रजी शाळांकडे जात असल्याने २००८ मध्ये महापालिकेने केजीपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे ठरविले. तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्य श्रद्धा माने यांनी यासंदर्भात संकल्पना आखल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला आणि प्रशासनाने त्याला साथ दिल्याने मखमलाबाद नाका येथे सर्व प्रथम केजीचे वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गांना मिळणारा प्रतिसाद बघून नंतर सिडको सातपूरसह अन्य भागातही इंग्रजी माध्यमाचे वर्ग वाढविण्यात आले. सद्यस्थितीत शहरातील पंचवटी विभागातील फुलेनगर येथे दोन तसेच चेहेडी आणि मखमलाबाद गावात प्रत्येकी एक तर सिडकोतील रायगड चौकात एक याप्रमाणे पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असून, त्यात साडेतीनशे मुले शिकत आहेत. मात्र या शाळा विनाअनुदानीत असून त्यात अल्पमानधनावर शिक्षक असतात. त्यांनाही अन्य चांगल्या खासगी शाळेत नोकरी मिळाली की तेही निघून जातात. सध्या इयत्ता चौथीपर्यंत महापालिकेच्या इंग्रजी शाळा असल्या तरी त्यातील मुलांना पाचवीत अन्यत्र प्रवेश घेण्यात अडचण निर्माण होते. शिवाय महापालिकेला सर्व खर्च स्वत:च्या अनुदानातून करून अग्निदिव्य पार पाडावे लागत असल्याने आता या शाळा बंद करण्याच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे.यासंदर्भात महापालिका शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून आयुक्तांना सादर केला असून, ते निर्णय घेणार आहेत. सध्या या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना पालिकेच्या सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.त्रास कमी होणारमहापालिकेच्या सातपूर येथील शाळेत इंग्रजी माध्यमासाठी विद्यार्थ्यांकडे शुल्क घेत असल्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासह अन्य कारणांमुळेदेखील महापालिकेने अकारण ताण वाढवून घेण्यापेक्षा त्रास कमी केलेला परवडला, अशी भूमिका घेतल्याचे समजते.
इंग्रजी माध्यम शाळा बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:23 PM
खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीपासून पुढील वर्ग सुरू केले खरे; परंतु विनाअनुदानित शाळा टिकणे कठीण असल्याने अखेरीस महापालिकेने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीनशे मुलांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना सेमीमध्ये सामावून घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्र्रस्ताव : शिक्षकांसह अन्य समस्या; मुलांना देणार सेमीत प्रवेश