लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : फिल्म सोसायटी चळवळ म्हणजे काय, त्याची पुसटशीही कल्पना नाशिककरांना नव्हती, त्यावेळी १९७९ या वर्षी मुंबईच्या ‘रसरंग’चे संपादक विजय जानोरकर यांनी फाळके फिल्म सोसायटीची स्थापना करून नाशिकमध्ये चित्रपट चळवळीची मुहूर्तमेढ राेवून ती वाढवत नेली. नाशिककर रसिकांतील चित्रपटांची अभिरुची वाढविणारा साक्षेपी संपादक, समीक्षक गमावल्याची खंत नाशिकच्या चित्रपट, कलारसिकांनी व्यक्त केली.
गत ४२ वर्षांपासून फाळके फिल्म सोसायटीचे संस्थापक म्हणून अविरत कार्यरत राहिलेले रसरंगचे संपादक विजय जानोरकर यांच्या अचानकपणे झाल्याच्या पार्श्वभूमीवर सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना गजानन ढवळे यांनी जानोरकर हे अत्यंत मित आणि मृदुभाषी, पण जाणकार समीक्षक होते, असे सांगितले. त्यांच्यामुळे अनेक नाशिककरांच्या चित्रपट जाणिवा समृद्ध झाल्या असून, फाळके फिल्म सोसायटीसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचेही त्यांनी नमूद केले. वसंत खैरनार यांनी जानोरकरांमुळे नाशिककरांना अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण चित्रपटांचा आनंद घेता आल्याची आठवण नमूद केली. रवींद्र गोडबोले यांनी चित्रपटांचा रसास्वाद कसा घ्यावा, चित्रपटांची बलस्थाने याबाबत अनेकदा त्यांच्याशी झालेला संवाद जाणिवा समृद्ध करणारा होता, असे सांगितले. सोसायटीच्या कामात, तसेच रसरंगचे संपादक म्हणून त्यांच्या कार्यातून त्यांनी अमीट ठसा उमटवला असल्याचे सांगितले. प्रमोद पुराणिक यांनी फाळके फिल्म सोसायटीलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी रघुनाथ फडणीस, श्रीमणी अहलुवालिया यांनीही शोकभावना व्यक्त केल्या. जानोरकर यांना श्रद्धांजली म्हणून या शोकसभेनंतर जिझस ऑफ मॉन्ट्रीयल हा कॅनेडियन चित्रपट दाखविण्यात आला.
फोटो -१२पीएचएफबी ९०
संपादक, समीक्षक विजय जानोरकर यांच्या शोकसभेत बोलताना वसंत खैरनार.