ऑनलाइन भरणा करण्यास पसंती
नाशिक : महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबविली असून, मुदतीच्या आत पैसे भरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जात असल्याने महापालिकेच्या वसुलीत वाढ झाली आहे. ऑनलाइन भरणा केल्यास अधिक फायदा होत असल्याने, अनेक नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाइन भरण्यास पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
खासगी बसचालकांचा मुक्काम वाढला
नाशिक : लॉकडाऊननंतर वाहतूक सुरळीत झाली असली, तर अद्याप लांब पल्याच्या खासगी बसेसला फारसे प्रवासी मिळत नसल्याने या गाड्यांचा नाशिक मुक्काम वाढू लागला आहे. काही बसेस दोन-दोन दिवस नाशिकमधून हालत नसल्याचे दिसते. यामुळे खासगी बसचालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
खासगी प्रवासी कारचालक अडचणीत
नाशिक : डिझेलचे दर वाढले असले, तरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी कारचालकांना मात्र कमी मोबदल्यातच व्यवसाय करावा लागत आहे. अनेक कारचालकांना परतीचेे भाडे मिळत नाही, यामुळे त्यांना संबंधित शहरात मुक्काम करून प्रवासी मिळाल्यानंतरच पुन्हा नाशिकला यावे लागते, यामुळे या व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष
नाशिक : लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला, तरी दुकानदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक दुकानदारांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडत आहे. अनेक दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. याबाबत दुकानदारांना समज देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.