नाशिक : प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख-समाधानदेखील लाभेल, असे मत कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी कीर्तनातून व्यक्त केले.
मुंबईनाका परिसरातील तुपसाखरे लॉन्समध्ये बुधवारी (दि. २२) संध्याकाळी इंदोरीकर यांचे कीर्तनाचे डॉ. संजय वराडे यांनी आयोजन केले होते. यावेळी इंदोरीकर यांनी आपल्या खास शैलीत टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी...’च्या जयघोषात कीर्तनाला प्रारंभ केला. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने इंदोरीकर यांना प्रतिसाद दिला. तुकोबारायांच्या गाथेतील अभंग घेत त्यांनी कीर्तन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी मानवी आरोग्याकडे लक्ष वेधत हृदयविकार हा आजार नाही तर एक प्रकाराचा मानसिक तणाव असल्याचे सांगितले. झालेली घटना जागच्या जागी विसरणे हे हृदयविकारावरील औषध आहे, असेही ते यावेळी म्हणाले. आई-बापाच्या आशीर्वादाशिवाय कोणीही या पृथ्वीतलावर मोठं झालेले नाही. त्यामुळे त्यांना सुखी-समाधानी ठेवायला शिका आणि विज्ञानासोबत बुध्दिमत्तेचा विकास घडविताना अध्यात्माची जोड देण्यास विसरू नका, असा सल्ला इंदोरीकर यांनी दिला.
---इन्फो--
निरोगी आयुष्य जगण्याची दिली त्रिसूत्री!
मन समाधानी ठेवा, कर्म प्रामाणिक करा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा, ही त्रिसूत्री अंमलात आणल्यास मनुष्य निरोगी व सुखी आयुष्य सहज जगू शकतो. कोणाचेही वाईट चिंतिले नाही तर आपलेही वाईट होत नाही, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही इंदोरीकर यांनी दिला.
--इन्फो--
रोप बदलतं; खड्डा तोच असतो...!
पावसाला सुरुवात झाली की भूछत्राप्रमाणे वृक्षारोपण करणाऱ्यांचं मोहोळ उठतं. रोप बदलतं अन् खड्डा मात्र तोच असतो, असा वृक्षारोपणाचा देखावा काय कामाचा? असा खडा सवालही इंदोरीकर यांनी यावेळी उपस्थित केला. पर्यावरण केवळ भाषणापुरतं ठेवलं असून, त्याचा पुरता ऱ्हास झाला असून, पर्यावरणाच्या भाषणांचा केवळ तमाशा चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. नद्यांची अवस्था इतकी घाण करून ठेवली. नद्या शुद्ध होणार नाही, तोपर्यंत वातावरण शुद्ध होणार नाही, हे लक्षात ठेवा, असे इंदोरीकर म्हणाले.