नाशिक : औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीचा उपयोग करीत पीकपद्धतीची लागवड करावी यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कृषी विकास प्रकल्प हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात बागायतदार शेतकरी, सामूहिक शेती व गट शेती राबविणारे शेतकरी वर्ग व सेंद्रिय शेतमाल खरेदीदार व निर्यातदार, व्यापारी, व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आला आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांनी स्पष्ट केले. निफाड तालुक्यांतील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवित आहेत; परंतु या मालाचे मार्केटिंग कसे करावे याचे तंत्र अद्याप माहिती नसल्याने यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा मदत करणार आहे.शेतकºयांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी प्रबोधन करणार आहे. कारण रासायनिक खते व औषधांचा मारा याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यासाठी शासनाकडूनच सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता कृषी संमेलन, गटचर्चा, कार्यशाळा घेण्यात येत आहेत.
सेंद्रिय पीकपद्धतीसाठी कृषी खात्याकडून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:44 AM