सातपूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप फाउंडेशन येथे अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.संदीप फाउंडेशन येथे आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी एन. बी. औताडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पी. आय. पाटील, संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे, प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. एस. बी. शिरसाठ, उपशिक्षण अधिकारी वाय. पी. निकम आदि उपस्थित होते. ऐच्छिक स्वरूपातील मूल्यमापन, मूल्यशिक्षण उपक्रम, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता सातवी, एनएमएमएस शिष्यवृत्ती, इयत्ता नववी एस.सी., एस.टी. मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता, इन्स्पायर अवॉर्ड, राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप आदिंसह विविध योजनांची माहिती शिक्षण अधिकारी औताडे यांनी दिली. प्राचार्य प्रशांत पाटील, प्राचार्य एस. टी. गंधे यांनी कुंभथॉम २०१४ च्या आयोजनाची माहिती दिली. सर्व शिक्षकांनी आपापसात निर्माण होणाऱ्या सकारात्मक वातावरणावर भर द्यावा, असे राज सिन्नरकर यांनी सांगितले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. शिरसाठ यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. पी. आय. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. स्वागत के. के. अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन आर. डी. निकम यांनी केले. एस. डी. शेलार यांनी आभार मानले. यावेळी गुरफान अन्सारी, एस. बी. देशमुख, एस. के. सावंत, सौ. आशुमती टोणपे, श्रीमती के. एम. मोरे आदिंसह जिल्ह्यातील सुमारे ७०० मुख्याध्यापक या शिबिरात सहभागी झाले होते. (वार्ताहर)