लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या जिल्ह्यातील लष्करातील जवानांना निवडणूक आयोगाने आॅनलाइन मतपत्रिका पाठवून त्यांना मतदानास प्रोत्साहन दिले असले तरी, जवानांनी दिलेल्या मतदानाची बारकोडने आगावू खात्री केली जाणार आहे. आयोगाने पहिल्यांदाच हा प्रयोग केला असून, त्यामुळे ज्या जवानांसाठी मतपत्रिका पाठविण्यात आली त्याच जवानाने मतदान केल्याची पडताळणी करण्यास मदत होईल. मतदानाच्या दिवशी मात्र जवानांच्या मतमोजणीनेच सुरुवात केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयोगाने त्या त्या जिल्हा निवडणूक यंत्रणेला आपल्या भागात कार्यरत असलेले, परंतु अन्य मतदारसंघातील रहिवासी असलेल्या लष्करातील जवानांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक येथील आर्टिलरी सेंटर, देवळाली कॅम्प छावणी येथे कार्यरत असलेल्या लष्करी जवानांची यादी लष्करी अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिली, त्याच धर्तीवर अन्य जिल्ह्यांतून अशाच प्रकारची यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याने, त्यातून त्या त्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील लष्करी जवानांची मतदार यादी तयार करण्यात आली होती. त्यात त्यांचे नेमणुकीचे ठिकाण नमूद करण्यात आल्याने आयोगाने अशा सैनिकांसाठी त्यांच्या मुख्यालयात आॅनलाइन मतपत्रिका पाठविली होती. त्यासाठी ईटीपीबीएस या प्रणालीचा वापर करण्यात आला. ज्या सैनिकासाठी मतपत्रिका पाठविण्यात आली, त्या मतपत्रिकेच्या सर्वांत खाली बारकोड देण्यात आला होता, शिवाय सैनिकांनी मतदान केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती निवडणूक अधिकाºयाकडे परत पाठवितांना आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या पाकिटातच पाठविणे गरजेचे होते. या पाकिटावरदेखील बारकोड टाकण्यात आला आहे. प्रत्येक लष्करी जवानासाठी स्वतंत्र बारकोड असल्यामुळे त्यानेच मतदान केले याची खात्री त्यातून पटण्यास मदत होणार आहे. शिवाय बनावट मतदान होणे त्यामुळे शक्य नाही.निवडणूक यंत्रणेने लोकसभेचे मतदानापूर्वीच आॅनलाइन मतपत्रिका सैनिकांसाठी रवाना केल्या होत्या. त्या आता पाकिटात बंद करून परत पाठविल्या जात आहेत. या मतपत्रिका मोजण्याबाबत निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरसिंगने निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संवाद साधून माहिती करून घेतली. त्यात प्रत्येक मतपत्रिकेच्या पाकिटावरील बारकोडची अगोदर स्कॅनिंग करून खात्री करून घ्यावी, जर स्कॅनिंग जुळत नसेल तर ती मतपत्रिका मोजण्यासाठी ग्राह्य धरू नये त्याचबरोबर पाकिटाचे बारकोड जरी जुळले तरी, आतील मतपत्रिकेच्याही बारकोडची स्कॅनिंग केल्याशिवाय ती मोजण्यासाठी न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता प्रथम सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी करावी व त्यानंतर निवडणूक कर्मचाºयांनी केलेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी व्हावी, असेही आयोगाने म्हटले आहे.