नाशिकरोड : प्रत्येक राशीच्या माणसाचा स्वभाव, गुण-अवगुण याची विविध उदाहरणाद्वारे माहिती देत मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. दत्तमंदिरोड शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘राशींचे स्वभाव- तुमची राशी तुमचा स्वभाव’ या विषयावरील सातवे पुष्प गुंफताना मंगेश पंचाक्षरी यांनी बारा राशींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे स्वभाव, गुण-अवगुण यांची सविस्तर माहिती दिली. मेष राशीचा स्पष्टवक्ता असतो, बोलण्याच्या परिणामाचा विचार करीत नाही, मिशा राखायला आवडतात, पुरुष खुनशी तर बायकांत नाजुकपणा नसतो. या राशीचे डॉक्टर, रेल्वे ड्रायव्हर, कंडक्टर नवरा- बायको यांच्या जीवनात घडणारे किस्से सांगितले. वृषभ राशीचा चिरतारुण्याचा लाभ, प्रेमळ, माफ करणारे, कष्टाळू, दिसायला देखणा अशा स्वरूपाचा असतो. मीन, तुळ राशीचेदेखील देखणे असतात. वृषभ राशीचे लोक सौंदर्याचे पूजक, म्हातारपण मान्य नसते. बायका नटतात, शरीर बांध्याची काळजी घेतात, मेकअपवर वेळ घालवितात, वय लपवितात असे विविध स्वभाव वैशिष्ट्ये सांगत नवरा-बायकोंचे विनोदी किस्से पंचाक्षरी यांनी सांगितले. कन्या राशीचे हुशार, गुप्तहेर, चुका शोधण्याची कसब बुद्धी, स्वच्छतेचा अतिरेक असे विविध स्वभाव वैशिष्ट्ये सांगितली. मिथुन राशीच्या व्यक्तीकडे सर्व प्रश्नांची उतरे असतात. खोडकर असतात पण कपटी नसतात, स्वत:हून ओळख काढतात, मार्केटिंग क्षेत्रात यशस्वी होतात. कर्क राशीचे मातृहृदयी, भावनाशील, पुरुष- साधे-सरळ, हळवे असतात. प्रभू रामचंद्रांची कर्क रास होती.आजचे व्याख्यान :तमाशा - काल, आज आणि उद्यावक्ते : डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेरवेळ : सायंकाळी ७ वाजता
राशी स्वभाव सादरीकरणाने रसिकांचे मनोरंजन : पंचाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:57 AM