लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर/दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरीतील प्रधान केंद्र, त्र्यंबकेश्वरच्या समर्थ गुरुपीठासह देशभरातील हजारो समर्थ केंद्रांवर श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. पर्जन्यराजानेही हजेरी लावल्याने सेवेकरी व भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. दिंडोरीत गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब, तर त्र्यंबकेश्वरी चंद्रकांत मोरे यांनी भाविकांशी संवाद साधत गुरुपौर्णिमेचा संदेश दिला. आषाढातील पौर्णिमेच्या म्हणजेच व्यासपौर्णिमेच्या मंगलदिनी संपूर्ण भारतभर गुरूंचे, आई-वडिलांचे तसेच आदरणीय व्यक्तीचे पूजन केले जाते. सेवामार्गातील लाखो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने या उत्सवाचे अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याने सर्वजण वर्षभर या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. सेवामार्गाचा गुरुपौर्णिमा उत्सव मंगळवारी म्हणजेच आषाढी एकादशीपासूनच सुरू झाला. मंगळवारपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट, कोकण, मुंबई असे विभागवार येऊन समर्थ महाराज तसेच गुरुमाउलींचे आशीर्वाद घेतले तरीही आज दिंडोरी, त्र्यंबकसह सर्वच केंद्रांवर पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. दिंडोरी प्रधान केंद्र तसेच त्र्यंबक गुरुपीठात दिवसभरात जवळपास तीन लाख सेवेकरी, भाविकांनी दर्शन, गुरुपूजनाचा लाभ घेतला.शनिवारी पहाटेपासून सर्वत्र लगबग दिसून आली. पहाटे दिंडोरीत गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब, तर त्र्यंबकेश्वरी चंद्रकांत मोरे यांनी गुरुपादुका पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन केले. दिंडोरीत उपस्थित सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाउलींनी दुष्काळ सदृश परिस्थितीत व संभाव्य दुष्काळाबाबत तीव्र चिंता व्यक्त करून पर्जन्यराजाच्या आगमनासाठी सेवेकऱ्यांनी आता खूप मोठ्या प्रमाणात राज्य व देशभर सेवा करण्याचे आदेशच दिले. गुरुमाउली म्हणाले, ‘नाशिक, दिंडोरी, त्र्यंबक परिसरात जरी पाऊस असला तरी महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागात अजून पर्जन्यराजानी हजेरी लावलेली नाही, ही परिस्थिती मोठी चिंताजनक आहे’.गुरुपौर्णिमेनिमित्त दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना गुरुमाउली प. पू. अण्णासाहेब मोरे.
स्वामी समर्थ केंद्रांवर गुरुपौर्णिमेचा उत्साह
By admin | Published: July 08, 2017 10:55 PM