नाशिक : भक्ती, मुक्ती, परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ॥ त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकत ॥ अशी प्रार्थना करत मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी अर्थात सोमवार (दि. २७) पासून गुरुचरित्र पारायणाला शहर व परिसरात मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.भगवान दत्ताविषयी श्रद्धा प्रकट करणे तसेच गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने भाविकांकडून गुरुचरित्र पारायणाचे पठण करण्यात येत आहे. गुरुचरित्रातून भाविकांना कुटुंबव्यवस्थेबद्दल माहिती होते, तसेच आपले आयुष्य संस्कारमय बनत असल्याची श्रद्धा आहे. दत्तभक्तांनी आपल्या राहत्या घरी, तर काही दत्तभक्तांनी दत्त मंदिरात तसेच स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सामूहिक गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली आहे. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते मागशीर्ष पौर्णिमा अशा सात दिवसांच्या कालावधीत गुरुचरित्र पारायण करण्यात येणार आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १ ते ९ अध्याय, दुसºया दिवशी १० ते २१, तिसºया दिवशी २२ ते २९, चौथ्या दिवशी ३० ते ३५, पाचव्या दिवशी ३६ ते ३८, सहाव्या दिवशी ३९ ते ४३ आणि सातव्या दिवशी ४४ ते ५३ अशा अध्यायांचे पठण करण्यात येणार आहे.हिंदू पंचांगाप्रमाणे शनिवारी (दि. २) मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी पौर्णिमेस प्रारंभ होत असून, रविवारी (दि. ३) रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. नियोजित प्रथेप्रमाणे दत्तभक्त रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता, तर स्वामी समर्थ सेवेकरी सोमवारी (दि. ३) दुपारी १२ वाजेनंतर दत्त जन्म सोहळा साजरा करणार आहेत. दत्त जन्माचा चौथा अध्याय वाचून दत्त जन्म सोहळा करण्यात येणार आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या सप्ताहाअंतर्गत शहरातील दत्त मंदिरांमध्ये वीणा पूजन, लघु रुद्र अभिषेक, महाआरती, भजन सेवा यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्साह : मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल श्री दत्तजयंती सोहळ्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:26 AM