नाशिक : आॅगस्ट महिन्याच्या पहिला रविवार (दि.५) सर्वत्र ‘फ्रेण्डशिप डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवरमैत्रदिनाचे वारे शनिवारपासूनच सोशल मीडियावरही वाहू लागले. अनेकांनी आपल्या वॉलवर ‘मैत्री’चे गोडवे गाण्यास प्रारंभ केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल, कव्हरफोटो, डीपी, बदलण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींविषयीचे प्रेम व त्यांच्या मैत्रीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारे छायाचित्र, सुविचारांची देवाण-घेवाणही होऊ लागली आहे. अनेकांनी ‘फ्रेण्डशिप डे’चे शनिवारी संध्याकाळी सेलिब्रेशन करत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले.
शहरातील बाजारपेठ सजली असून, तरुणाई हा मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जेव्हा रक्ताचे नाते फोल ठरते तेव्हा मैत्रीचे नाते उपयोगी पडते’ असे बोलले जाते. मित्र, मैत्रीण अन् त्यांच्यातले मैत्रीचे बंध हे अधिकाधिक घट्ट होत जावे यासाठी दरवर्षी तरुणाई आॅगस्टचा पहिला रविवार ‘मैत्र दिन’ म्हणून साजरा करतात. या दिनाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या दिनाची ‘क्रेझ’ दिसते. हा दिवस अविस्मरणीय म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करण्यासाठी तरुणाईने विविध बेत आखले आहेत. शहराजवळील पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट, मिसळ पॉइंट, कृषी पर्यटन केंद्र आज गजबजणार आहे. पूर्वसंध्येला तरुण-तरुणींनी शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात गर्दी आपल्या मित्र-मैत्रिणींना द्यावयाच्या भेटवस्तू तसेच मनगटावर बांधायचे मैत्रिबंध, अंगठी, शुभेच्छापत्रे, टेडिबेअर, परफ्युम, मैत्री अधोरेखित करणारे की-चेन, कॉफी मग, फोटो-फ्रेम, घड्याळे अशा विविध वस्तूंना मागणी वाढली आहे.