चांदोरी : येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात नारायण महाराज पटांगणात शुक्रवारी (दि.१९) खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग आढळून आल्याने इतिहास समोर येणार आहे. याबाबत पुरातत्व विभागाने संशोधन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.चांदोरी हे अतिप्राचीन व ऐतिहासिक गाव आहे. येथे गोदावरी नदीपात्रात असलेले हेमाडपंती मंदिर तसेच श्रीराम मंदिर व पंचमुखी महादेव मंदिर, सावकार वाडा, जहांगीर वाडा असा प्राचीन वारसा लाभला आहे. खंडेराव मंदिर विकासकामानिमित्त नारायण महाराज पटांगणात सध्या खोदकाम सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना पूर्व भागात आतमध्ये तळघर आढळून आले. सदर ठिकाणी एक दरवाजा आढळून आला. या तळघराची भिंत चुना व शिवकालीन विटांपासून व बाजूने दगडांपासून बनवलेली आढळून आली आहे.श्रीराम मंदिरापासून नदीपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, तो हाच मार्ग असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा भुयारसदृश मार्ग शेकडो वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती होताच अनेकांनी भेटी देऊन पाहणी केली.चांदोरी गाव परिसरात अनेक पुरातन मंदिर आहेत. येथील गोदावरी नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नदीपात्रातील अनेक मंदिर दृष्टीत पडतात. यामुळे या भुयारी मार्गाविषयी सर्वसामान्य नागरीकांमध्ये कुतुहल निर्माण झाले असून खोदकामात भुयारी मार्ग सापडल्याचे वृत्त गाव परीसरात पसरल्याने येथे नागरीकांची गर्दी झाली होती. पुरातत्व विभागाने याबाबत संशोधन करण्याची मागणी होत आहे.
चांदोरीत आढळले भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:55 AM
चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात नारायण महाराज पटांगणात शुक्रवारी (दि.१९) खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग आढळून आल्याने इतिहास समोर येणार आहे.
ठळक मुद्देपटांगणात खोदकाम ; शेकडो वर्षांचा इतिहास येणार समोर