नाशिक- येथील पंचवटी हॉटेल समुहाचे संस्थापक आणि उद्योजक राधाकिसन रामनाथ चांडक यांचे हृदय विकाराने आज निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दहा दिवसांपासून रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. अखेरीस आज दुपारी २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मुळचे सिन्नर तालुक्यातील रहीवासी असलेले चांडक हे कोंबडा बिडीचे संचालक देखील होते. व्यापाराच्या निमित्ताने देश विदेशात प्रवास केल्यानंतर नाशिक शहरात चांगलेहॉटेल असावे यासाठी त्यांनी १९८३ मध्ये वकील वाडीत हॉटेल पंचवटी सुरू केले. सुरूवातीला एका हॉटेल पर्यंत मर्यादीत असलेल्या या हॉटेल्सचे पंचवटी ग्रुप हॉटेल असा विस्तार झाला.संगमनेर, पुणे, मुंबई तसेच राज्याबाहेर गुडगाव आणि जबलपुर येथेही शाखा वाढल्या. हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या नाशिक हॉटेल असोसिएशनचे ते संस्थापक होते तसेच त्यांनी अध्यक्षपदही भूषवले. अर्पण रक्तपेढीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम बघितले.
संस्कृती वैभव, सार्वजनिक वाचनालय या संस्थांशी ते संबंधीत होते. अनेक संस्थांना त्यांनी देणगी देऊन पाठबळ दिले होते. माहेश्वरी समाजाच्या वतीने तसेच अन्य काही संस्थांच्या वतीने त्यांना सन्मानीतही करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात सुपूत्र तथा उद्योजक अतुल, सून शिवमाला, मुलगा रचना भुतडा तसेच नातु गौरव असा परीवार आहे.