नाशिक : केंद्र सरकारने उडान योजना सुरू करूनही नाशिकमधून ही सेवा सुरू करण्यास मुंबई विमानतळावर वेळ देण्यास जीव्हीके कंपनी टाळाटाळ करीत असल्याने नाशिकमधील उद्योजक आणि विविध व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व दिल्लीत याचसंदर्भात आंदोलन करणाºया खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिला.नाशिकमध्ये ओझर विमानतळावरून नाशिक ते मुंबई व पुणे या मार्गावर सेवा सुरू करण्यास एअर डेक्कनने उत्सुकता दर्शवली होती. मात्र जीव्हीके कंपनीने वेळच दिलेली नाही. या उलट गुजरातमधील पोरबंदर, कांडला आणि सुरतसाठी मात्र स्लॉट देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांवर अन्याय होत असल्याची भावना यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात मांडण्यात आली आहे. विमानसेवा हा नाशिकच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरू शकणार आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक या सेवेसाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर स्लॉट मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, ‘तान’चे उपाध्यक्ष राजेंद्र बकरे तसेच निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, निखिल पांचाळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष कोठारी उपस्थित होते.
विमानसेवेसाठी शहरात उद्योजकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:46 AM