सातपूर : राज्यातील उद्योजकांना समान वीज दर असावेत, अशी मागणी करीत नाशिकच्या उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली; मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावत मराठवाडा आणि विदर्भासाठीची वीज सवलत कायम राहील अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने नाशिककरांना रिकाम्या हाती परतावे लागले. शासनाने फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांसाठी विजेच्या दरात सवलत जाहीर केल्याने नाराज झालेल्या नाशिकच्या उद्योजकांनी बुधवारी मुंबईला जाऊन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. अनुशेष भरून काढावयाचा असल्याने ही सवलत द्यावीच लागणार आहे. इतरांना सवलत दिली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाराज झालेल्या उद्योजकांनी लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली; मात्र उद्योजकांनी काही बोलण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी उर्वरित महाराष्ट्राला आतापर्यंत खूप सवलती दिल्या आहेत आता पुन्हा सवलती मिळणार नाहीत, असे ठणकावून सांगत शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार मागासलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याला एक रुपयाने विजेच्या दरात सवलत देण्याचा निर्णय झाला आहे. त्यात बदल होणार नाही अशा शब्दात उद्योजकांना सुनावले आणि अवघ्या काही मिनिटात हा प्रश्न निकाली काढला.बैठकीस निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, आशिष नहार, राजेंद्र अहिरे, दीपक नागरगोजे, सुरेंद्र मिश्रा, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, महेश हिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
उद्योजक रिकाम्या हाती परत
By admin | Published: February 10, 2016 11:40 PM