नाशिक : जिल्ह्यातील उद्योजकांनी सोमवारपासून उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत केलेल्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांचे उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
जिल्ह्यात १२ मेपासून लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यात उद्योगांवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अवघा एक टक्का उद्योग जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याचे प्रशासकीय आकड्यांवरून दिसून येते. त्यामुळे येत्या सोमवारपासून उद्योग पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे साकडे उद्योजकांनी शनिवारी (दि. १५) पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत घातले होते. परंतु. उद्योजकांच्या मागणीविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने उद्योजकांना आणखी काही दिवस उद्योग पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उद्योजकांनी उद्योग बंद ठेवत प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु, गत चार दिवसांपासून रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे सोमवार (दि. १७) पासून जिल्ह्यातील उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करीत अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे आदींनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून त्यांना उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन दिले होते.
इन्फो
उद्योगांवर होणार परिणाम
जिल्ह्यातील एक टक्क्यापेक्षा कमी उद्योग कामगारांच्या निवासाची व राहण्याची व्यवस्था करू शकल्याने, असेच सध्या उद्योग सुरू आहेत. उर्वरित सर्व उद्योग बंद असून याचा दूरगामी परिणाम नाशिकच्या उद्योग आणि विकासावर होणार आहे.