नाशिक : दीड ते दोन वर्षांनंतर मुहूर्त लागलेली जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक रद्द केल्याने या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांना माघारी परतावे लागले आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन व्यवस्थापकांविरुद्ध उद्योजकांच्या वाढत्या तक्रारींमुळे दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आलेली जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक नंतरच्या कालावधीत होऊ शकली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात अडकून पडले व त्यानंतर आलेल्या बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनाही सव्वा वर्षात बैठकीसाठी वेळ मिळालेला नाही. उद्योजकांनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अशा प्रकारची बैठक घेण्याची अनुमती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यावर सोमवारी रात्री आठ वाजता जिल्ह्यातील उद्योजकांना बैठकीचे निमंत्रण पाठवावे लागले. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील उद्योजकांनी चार वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग असल्याच्या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी सदरची बैठक ऐनवेळी रद्द केली. परिणामी उद्योजकांना रिकाम्या हाती परतावे लागले. आता उद्या बुधवारी ही बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उद्योजकांना सांगण्यात आले असले तरी, त्यावर विश्वास ठेवण्यास उद्योजक तयार नाहीत.
बैठक रद्द झाल्याने उद्योजक माघारी
By admin | Published: April 19, 2017 1:24 AM