मुख्यालयात येणाऱ्या पदाधिकारी किंवा नगरसेवकांबरोबर केवळ तीनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. दुसरीकडे नागरिकांना देखील मुक्त प्रवेश नसेल.
शहरात कोरोनाबाधजतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वच सार्वजनिक ठिकाणी तसेच महापालिकेच्या कार्यालयातदेखील गर्दी टाळणे आवश्यक ठरले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालयांबरोबरच लग्नसराईलादेखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत. महापालिका तर सर्वांत महत्त्वाचे कार्यालय असून आता त्याठिकाणी राजकीय नेते, नगरसेवक आणि नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांसाठी राबता असतो. गेल्यावर्षी राजीव गांधी भवनात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात कोरोनाला आवर घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या मुख्यालयात आणि अन्य कार्यालयात देखील केवळ तीनच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे अभ्यागतांना ज्या विभागात काम करायचे आहे, त्याठिकाणच्या अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीनेच प्रवेश करता येणार आहे. तक्रारीसंर्दभात महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना त्यांची तक्रार तितकी तीव्र असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे, अन्यथा नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्यास सांगितले आहे. मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी आता एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू असेल. त्याठिकाणी तपासणी करून मगच नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. महापालिकेच्या राजीव गांधी भवनात रोज किती अभ्यागतांनी भेटी दिल्या याची नोंद ठेवून तसा अहवाल रोज आयुक्तांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इन्फो...
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने सध्या महापालिकेत राजकीय कार्यकर्त्यांचा राबता वाढला आहे. त्यातच राजकीय नेते किंवा नगरसेवकांबरेाबर येणाऱ्या नागरिकांची अडवणूक करणे सुरक्षारक्षकांच्या हाताबाहेरचे काम आहे. त्यामुळे त्याबाबत आता नगरसेवकांनीदेखील भान बाळगले पाहिजे, असे कर्मचारीवर्गातून मत व्यक्त होत आहे.