नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिली असून वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादूर्भाव वाढू लागला असून तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यावर्षी अल्प राहिल्याने यावर्षी द्राक्षांना पुरेसे पाणी मिळणेही अवघड झाले आहे. एकूणच द्राक्ष बागायतदार वातावरण बदलाच्या या दुष्परिणामांमुळे संकटात सापडल्याचे चित्र आहे.नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जात असल्याने वाईनरीची संख्याही वाढली आहे. येथील वाईन, द्राक्षांना विदेशी बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ आली आहे. वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले. द्राक्षाचा मणी तयार होत असताना वातावरण बदल, मुबलक पाण्याच्या अभावामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने पीकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही शेतक-यांनी कूपनलिकादेखील केल्या आहेत; मात्र कूपनलिकांची पाण्याची पातळी खोल गेली आहे.
वातावरण बदल : द्राक्षपिकांवर किटकांचा वाढता प्रार्दूभाव; शेतकरी चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 2:34 PM
वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले.
ठळक मुद्दे निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने पीकांना पाणी देणे अवघड वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर किटकांचा प्रादूर्भाव