नाशिक : हिरावाडी येथील संवेदना फाउंडेशनने गणेशोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन आदि कामे करीत पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू ठेवले आहे. हिरावाडी येथील साईसिद्धी पार्क येथे २००८ पासून संवेदना फाउंडेशनने आपल्या कामास सुरुवात केली. संवेदना फाउंडेशनकडे दरवर्षी ४ ते ५ टन गणेशमूर्तींचे संकलन होते. संकलित झालेल्या मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या जातात. फाउंडेशनमध्ये प्रशांत कदम, अॅड. अजय निकम, सचिव विसपुते, तुषार भडांगे, अविनाश बोडके, डॉ. अविनाश देवरे, आप्पा बैरागी, चिंतामणी अहिरे आदिंसह ५० कार्यकर्ते कार्यरत आहेत. अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत म्हसोबा महाराज पटांगण, पंचवटी येथे संस्थेचे कार्यकर्ते गणेशमूर्ती स्वीकारण्याचे, नागरिकांना मूर्तिदान करण्याबाबत प्रबोधन करण्याचे काम करतात. संस्थेच्या उपक्रमात सदस्यांचे कुटुंबीयही उत्स्फूर्तपणे सहभाग देतात. मूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यामुळे गोदावरीचे पाणी प्रदूषित होत असल्याचे पटवून दिल्यानंतर लोकांची मानसिकता आता बदलत चालली आहे. दरवर्षी मूर्तिदान करणाºयांचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांनी गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीचे विसर्जन न करता त्या दान कराव्यात यासाठी ‘स्वर अक्षर नृत्य’ गणेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संवेदना फाउंडेशनकडून मूर्ती संकलनासह पर्यावरणाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:36 AM