नाशिक : महात्मा गांधींचे स्वावलंबन, स्वच्छता आणि पर्यावरण प्रेम हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या पर्यावरणप्रेमाचा विचार करून नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने इंडियन सायकल डे साजरा करावा असा आग्रह धरत असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे नाशिकमधील आमदार आणि महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधींनी त्यात सहभागी होऊन चालना दिली.गंगापूरोडवरील डोंगरे मैदानावर सकाळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते शुभारंभ झाला. आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवका अश्विनी बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधींच्या आवाहनाप्रमाणे सर्वांनी सायकल चालवून पर्यावरणाचे जतन करावे, असे आवाहन यावेळी नाशिक सायकलिस्टचे किरण चव्हाण यांनी केले. केवळ काही वेळासाठी नाही तर दैनंदिन सायकलींचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जसपालसिंग यांनी केले. महापौरांनीही सायकल चालवणे आरोग्यदायी असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनीषा रौंदळ यांनी व्यक्त केले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. गंगापूररोड मार्गे जेहान सर्कल, एबीबी सर्कल, त्र्यबंकरोड मार्गे ग्रीन व्ह्यू हॉटेल मार्गे परत ही रॅली डोंगरे मैदानावर नेण्यात आली. कार्यक्रमात दीपक बागड, राजेंद्र वानखेडे, विलास पाटील, महेश हिरे, अॅड. लक्ष्मण लांडगे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सायकलिंगद्वारे पर्यावरणाचा संदेश
By admin | Published: October 02, 2015 10:37 PM