नाशिक : बारावीसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ व ‘जलसुरक्षा’ विषय बंधनकारक करण्यात आला असून, या विषयाची गुण विभागणी श्रेणी पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांना पर्यावरणासह पाणी व्यवस्थापनाचे ज्ञान मिळण्यासाठी अकरावी, बारावीला हे विषय बंधनकारक करण्यात आले असून, ५० गुणांसाठी असलेल्या या विषयात प्रकल्प कार्यासाठी ३०, तर जर्नल-सेमिनार कार्यासाठी २० अशी गुणांची विभागणी आहे. परंतु, यावर्षी पर्यावरण प्रकल्पासाठी व जर्नलसाठी आवश्यक प्रकल्प पुस्तिका अद्यापही बालभारतीने उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नसल्याने या विषयाचे गुणदान कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बालभारतीकडून अजूनही पर्यावरण प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या वही छपाईचे काम सुरू असल्याचे बालभारतीतील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज केलेले असताना बालभारतीकडून नाशिक विभागासाठी प्राथमिक टप्प्यात केवळ ५० हजार प्रकल्प पुस्तिकांची मागणी केलेली आहे. ही मागणीही अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे विभागातील दुकानांमध्येही ही प्रकल्प पुस्तिका उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून ही प्रकल्प पुस्तिका केव्हा मिळणार आणि प्रकल्पाचे काम पूर्ण करून तो सादर केव्हा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर प्रकल्प पुस्तिकाच नसल्याने बारावीची गुणदान प्रक्रियाही रखडली आहे. त्यामुळे आधीच लांबलेला बारावीचा निकाल आणखी रखडणार असून निकाल जाहीर होऊन पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
कोट-
बालभारतीकडून अद्याप बारावीची पर्यावरण पुस्तिकाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक मात्र पुस्तिकेसाठी दुकानदारांकडून तगादा लावत आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे बालभारतीकडून होत असलेल्या उशिराचे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नाही. तसेच केव्हापर्यंत पुस्तिका उपलब्ध होणार हेही सांगितले जात नाही.
- अतुल पवार, अध्यक्ष, बुक सेलर्स असोसिएशन, नाशिक
कोट-
नाशिकसाठी प्राथमिक टप्प्यात ५० हजार पुस्तिकांची मागणी केलेली आहे. परंतु बालभारतीकडून अजूनही पुस्तिकांची छपाई सुरू असल्याने उशीर होत आहे. या पुस्तिका लवकरच विभागीय भांडारास प्राप्त होणार असून पुस्तिका प्राप्त होताच तत्काळ वितरण सुरू केले जाणार आहे.
- व्ही. एन. पिसे, बालभारती भांडार व्यवस्थापक, नाशिक
कोट-
पर्यावरण प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्याच प्रकारच्या अन्य पुस्तिकांमध्ये प्रकल्प अहवाल तयार करून तो तपासून घेण्यास हरकत नाही. सद्यस्थितीत प्रकल्प पुस्तिकांची प्रतीक्षा करण्यास वेळ उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुकानांमध्ये प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होण्याची प्रतीक्षा न करता उपलब्ध साहित्याचा वापर करून प्रकल्प अहवाल सादर करून ते तपासून घ्यावेत.
- के. आर. गिते, उपप्राचार्य, केव्हीएन नाईक महाविद्यालय, नाशिक