पेठ - मुलगी ही धनाची व सुखाची पेटी असते. कन्या ही पर्यावरण संरक्षणाची खाण असल्याने वनविकास महामंडळाच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाने पेठ तालुक्यात कन्या वन समृद्धी हे अभियान सुरु केले असून याद्वारे दत्तक घेतलेल्या गावामध्ये मागील दोन वर्षात जन्माला आलेल्या मुलींच्या आई,वडिलांना रोपांचे वाटप करून लेकीच्या नावे वृक्षारोपण करण्याची अभिनव संकल्पना सुरू केली आहे.
सामाजिक वनीकरण पेठ परिक्षेत्रातील घनशेत, भायगाव व कोपुर्ली बुद्रूक ही गावे दत्तक घेऊन सदर गावात कन्या वन समृद्धी या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत वरील गावांमधील सन २०१९ - २० व सन २०२० - २१ या वर्षांमध्ये ज्या बालिकांचा वरील गावांमध्ये जन्म झाला आहे अशा बालिकांच्या नावाने त्यांचे माता,पित्यांना प्रत्येकी दहा रोपे यात पाच सागवान प्रजातीची रोपे व पाच फळझाडे रोपे विभागीय वनअधिकारी सी. डी. भारमल यांचे हस्ते वाटप करण्यात आली. तसेच वाटप केलेली रोपे ही सदर माता,पित्यांनी त्यांचे शेतात अथवा घराजवळ लागवड करणे बाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी वाटप केलेली रोपे आपापल्या शेतात घराजवळ व गावात लागवड करणे बाबत सांगितले.
याप्रसंगी विभागीय वनअधिकारी सी. डी. भारमल, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनरक्षक डी. पी. जाधव, एम. एम. जाधव, बी. ए. बंगाळ यांचेसह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कन्या वन समृद्धी योजनेचे लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
वृक्षारोपण करून प्रात्यक्षिक
या योजने व्यतिरिक्त गावातील ज्येष्ठ व्यक्ती यांचा मृत्यू झाला असल्यास अशा व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येकी एक रोप त्यांचे नातेवाईक यांना वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोणाचे वाढदिवस, लग्न या गोष्टींचे स्मरणार्थ प्रत्येकी एक रोप लावून उत्सव साजरा करणे व यामुळे अशाच छोट्या-मोठ्या प्रत्येक प्रसंगात गावाचे परिसरात रोपे लागवड होऊन गावाचे वृक्ष अच्छादन वाढवण्यासाठी गावातील लोकांमध्ये आवड निर्माण करणे याबाबत वनअधिकारी व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. वाटप केलेली रोपे ही जागेवर खड्डा खोदून कशा पद्धतीने लागवड करावयाची याचे जागेवर वृक्षारोपण करून प्रात्यक्षिक करून दाखविले.
-----------------
घनशेत येथे कन्या वन समृद्धी अभियानांतर्गत लेकीचे झाड लावताना सी.डी. भारमल, प्रशांत खैरनार यांचेसह वनकर्मचारी व मुलींचे पालक. (०२ पेठ ३)
020721\02nsk_8_02072021_13.jpg
०२ पेठ ३