त्र्यंबकेश्वर : (वसंत तिवडे ) दरवर्षी गटारी तुंबल्या, गोदावरीला पूर आला, नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले, गावात पाणी शिरले किंवा डोंगर बोडके झाले तर होणाऱ्या नुकसानीला केवळ नगर परिषदेला जबाबदार धरण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी व पालिका प्रशासनाने आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत त्र्यंबक शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प केला आहे.गोदावरी उगमाच्या एक ते दोन किमी परिसर वृक्षराजीने नटविणे, पाण्याचे स्रोत शोधून ते मोकळे करणे आदी कामांसाठी गावातीलच काही सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यात आयपीएल ग्रुपचे ललित लोहगावकर व त्यांचे सहकारी अव्याहतपणे प्रयत्न करीत आहेत. या ग्रुपच्या वतीने दररोज वृक्ष लागवड करणे, ती जगवणे, वाढ झालेल्या झाडांना ओटे व पार बांधणे, पाय-यांच्या भिंतींची डागडुजी करणे तसेच इतस्तत: पडलेले दगड -गोटे नीट ठेवत परिसराच्या स्वच्छतेवर भर देत आहेत. डॉ.पंकज बोरसे हेदेखील हरित ब्रह्मगिरीसाठी त्यांच्या ग्रुपतर्फे एक हजार रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले आहेत. दरम्यान, दोन तीन वर्षांपूर्वी त्र्यंबकच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी डोंगरावर पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते डोंगरातच जिरावे यासाठी १ बाय १ फुटाचे हजारो खड्डे पालिका कर्मचाऱ्यांकडून खोदून घेतले होते. हा प्रयोग यशस्वी होऊन त्यावर्षी गावात पूर आला नाही, तर विद्यमान मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनीही शहरात फक्त एक हजार झाडे लावायची व ती झाडे एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय या बँकांना दत्तक देऊन वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प सोडला आहे.-------------------------पुण्यश्लोक राजामाता अहल्यादेवी होळकर, पेशवेकाळातील राजे व महाराजे आदींनी आपापल्या राजवटीत भाविक यात्रेकरुंना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलेले जलाशय कालपरत्वे बुजून गेले होते. ते जलाशय शोधण्याचे काम आयपीएल ग्रुपने केले. असे जलाशय, विहिरी शोधून त्या स्वच्छ केल्या. पडलेला भाग स्वखर्चाने दुरुस्त केला. तसेच आयुर्वेदिक औषधांच्या दुर्मीळ झाडांची लागवड सुरू केली आहे. दोन्ही पहाडांवर जंगल व्हावे हाच ध्यास आम्ही काम करीत आहोत.- ललित लोहगावकर, आयपीएल ग्रुप, त्र्यंबकेश्वर--------------------------------------पावसाच्या एक महिना अगोदरच गोदा सफाई मोहीम कंत्राटी कामगारांकडून करून घेतली. कुशावर्त तीर्थ ते थेट तुंगार पेट्रोलपंपापर्यंत नदीपात्र जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी सारखे करून स्वच्छता केली. अहिल्या नदी थेट संगम घाटापर्यंत स्वच्छ केली. गावातील निलगंगा म्हातार ओहोळ वगैरे ओढे, नाले स्वच्छ केले. या नाले, ओढे व नद्यांमध्ये वरपर्यंत घाण आल्याने गावात पूरपरिस्थिती निर्माण होत असे. आता सर्वच स्वच्छ केल्याने प्रदूषणाचा धोका नाही व पूर येण्याचा धोकाही उरला नाही. - डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर परिषद
त्र्यंबक प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:39 PM