पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून वसुंधरेला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा दिंडोरी नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी असणार आहे.
सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी दिंडोरी नगर पंचायत कार्यालयास १५ सप्टेंबर दरम्यान कार्यालयीन वेळेत नावनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यावर नगर पंचायतच्या पाहणी पथकाद्वारे पाहणी करण्यात येईल व स्पर्धेसाठी पात्र गणेशभक्तांची निवड करण्यात येईल. बाप्पाची मूर्ती पर्यावरण रक असावी. मूर्तीचे रंग, सजावट हेही पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक व थर्माकोलविरहित हवी. पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन घरीच करून त्या मातीत भारतीय / स्थानिक प्रजातीच्या झाडाचे रोप लावावे. लावलेल्या रोपासोबत जिओ-टॅग सेल्फी फोटो घेऊन नावासह पाठवावा. पर्यावरणपूरक मूर्ती/सजावट, मूर्ती विसर्जन व रोप लागवड या आधारे उत्कृष्ट गणेशभक्त यांना ‘पर्यावरणस्नेही गणेशभक्त’ बक्षीस देण्यात येईल. गणेशोत्सव काळातील निर्माल्याचे घरीच खत तयार करून घरातील ओल्या कचऱ्याचे खत करण्यास सुरुवात करावी. या उपक्रमात भाग घेणाऱ्या गणेशभक्तांनी दर महिन्याला २० तारखेला जिओ टॅग सेल्फी नगर पंचायतीस पाठवावा. यात सातत्य ठेवणाऱ्या व रोपाचे संवर्धन करणाऱ्या गणेशभक्तास २६ जानेवारी २०२२ रोजी विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगर पंचायत मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.