नाशिक : शनिवारपासून (दि. १) सुरू होणाऱ्या सप्तशृंगगड व कोटमगाव येथील नवरात्रोत्सवासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे यात्रास्थळी २४ तास आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरवर्षी सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगगड ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात येते. यावर्षीही सप्तशृंगगडावर उभारण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा केंद्रात १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नऊ आरोग्यसेविका, नऊ आरोग्यसेवक, नऊ औषधनिर्माण अधिकारी, तसेच शिपायासह अन्य नऊ असे एकूण ३६ कर्मचारी २४ तासांसाठी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यंदा पहिल्यांदाच येवला तालुक्यातील कोटमगाव येथेही जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे. कोटमगाव येथे जिल्ह्णासह शेजारील अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव व धुळे जिल्ह्णातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनाही आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने पाच वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 01, 2016 1:02 AM