सातपूर : अविरत रुग्णसेवा देणाऱ्या ईएसआय रुग्णालयातील रुग्णालय कर्मचारी वसाहतीत मात्र सुविधांची वाणवा आहे. इमारतींभोवती अस्ताव्यस्त वाढलेले गवत, अंतर्गत रस्ते, तुटलेली खेळणी, झाडाझुडपात हरवलेला जॉगिंग ट्रॅक यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या कर्मचाऱ्यांना सर्पाची भीतीही वाटत आहे.जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने सातपूर येथे भव्य असे राज्य कर्मचारी विमा रुग्णालय (ईएसआय हॉस्पिटल) उभारले आहे. कामगारांना रुग्णसेवा वेळेवर मिळावी म्हणून रुग्णालयातील कर्मचाºयांना निवासाची सोय करण्यासाठी वसाहत बांधण्यात आली आहे. यात द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांसाठी रुग्णालय आवारातच वसाहत उभारण्यात आली आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची खूपच दुरवस्था झालेली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. इमारतींच्या स्लॅबवर गवत उगवलेले आहे. इमारतींच्या अवतीभोवती झाडीझुडपे वाढलेली आहेत. त्यातून सर्प बाहेर येत असतात. या वसाहतीत सर्पांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने लहान मुलांना सांभाळावे लागत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. या वसाहतीच्या मध्यभागी विरंगुळ्यासाठी लहानसे क्रीडांगण आहे; पण त्या ठिकाणी गवत वाढलेले असल्याने त्याचा उपयोग होत नाही. जॉगिंग ट्रॅकलादेखील गवताने वेढलेले आहे. त्याचाही उपयोग होत नाही. मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी फार वर्षांपूर्वी मोडून पडलेली आहे. डासांचे तर प्रचंड साम्राज्य असल्याची महिलांची तक्रार आहे. काही पथदीप बंद अवस्थेत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. साफसफाई आम्हालाच करून घ्यावी लागत असल्याचे महिलांनी सांगितले. या वसाहतीतील सर्वच इमारतींची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.
ईएसआय कर्मचारी वसाहतीचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 12:49 AM