सिडको : नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी एव्हीएशन कमिटीची स्थापना करण्यात आली.बुधवारी (दि. १८) आयमा रिक्रिएशन सेंटर येथील के. आर. बूब कॉन्फरन्स सभागृहात झालेल्या बैठकीत व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे मनीष रावल, नाशिक सिटिझन फोरमचे आशिष कटारिया, निटाचे अध्यक्ष अरविंद महापात्रा होते. यात आयमा, निमा, महाराष्ट्र चेंबर, निटा, नाशिक सिटिझन फोरम व इतर संघटना सहभागी होणार आहेत.आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी सांगितले की, नाशिकचा सर्वांगीण विकास सुरळीत व दररोज विमानसेवा नसल्यामुळेच थांबलेला आहे. उडान सेवेअंतर्गत विमानसेवा विकसित होणार होती पण झाली नाही, त्यामुळे नाशिकचा विकास झाला नाही. उडान सेवेअंतर्गत हा विकास होणार होता तो विकास का झाला नाही याचाही खुलासा झाला पाहिजे, असे प्रतिपादन आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी केले.यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष सल्लागार समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी, ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राजकीय वर्ग प्रयत्नशील आहे, तर प्रशासकीय यंत्रणेचा अभाव असल्याचे सांगितले. नाशिक सिटिझन फोरमचे आशिष कटारिया यांनीही नाशिकच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे सांगितले.निमाचे मनीष रावल यांनी उडान सेवेअंतर्गत आम आदमी विमानसेवेद्वारा उद्योग, व्यवसायासाठी जोडले जाणार होते पण तसे झाले नाही. विमान कंपन्या पाहणी करून जातात पण सुरळीत सेवा देत नाहीत, असे सांगितले.यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी नाशिकचा औद्योगिक विकास विमानसेवा सुरळीत नसल्याने रखडलेला आहे. यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याचे व या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. यावेळी आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, उन्मेष कुलकर्णी, नीलिमा पाटील, विजय जोशी, गोविंद झा उपस्थित होते.नाइट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे आता तरी देशात व परदेशात उडानमार्फत सुरळीत विमानसेवा विमान कंपन्यांनी द्यावी. नाहीतर वेळप्रसंगी नियमित विमानसेवा मिळण्यासाठी आंदोलनही करण्यात येईल, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. नाशिकचा आयटी विकास साधायचा असेल तर विमानसेवा फार महत्त्वाची आहे. विमानसेवा सुरळीत नसल्यामुळे नाशिक आयटी क्षेत्रात पुढे गेले नाही, अशी खंत नीटचे अध्यक्ष अरविंद महापात्रा यांनी व्यक्त केली.
उद्योजक संघटनांतर्फे एव्हीएशन समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:13 AM