कोरोना महामारीमुळे अनेक अटी-शर्ती लागू असल्या तरी, गणरायाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सिडको व अंबड भागातील सुमारे ३१ सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच घराघरांत गणरायाचे उत्साहात आगमन झाले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक नियम व अटी लागू करण्यात आल्याने अनेक मंडळांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, परंतु असे असले तरी सिडको व अंबड भागातील सार्वजनिक मंडळांच्या वतीने गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून स्थापना करण्यात आली. सिडको वसाहत मित्रमंडळ, वंदे मातरम् मित्रमंडळ, तुळजाभवानी चौक येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ, साई मोरया मित्रमंडळ, अंबड येथील मौल्यवान असलेल्या श्रीकृष्ण मित्रमंडळ यासह लहान, मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.
चौकट==
सिडको व अंबड भागात गणरायाच्या स्वागतासाठी सकाळपासूनच गणेशभक्तांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. अत्यंत भक्तिमय वातावरणात व जल्लोषात सर्व सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळाजवळ बंदोबस्त देण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.