नाशिक : जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. अनधिकृत उत्खननाबाबत नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून तक्रारी प्राप्त होत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संतुलन व स्थायी विकास साधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे जाहीर केले होते. दोन आठवड्यांपूर्वी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आल्यानंतर टास्क फोर्सला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
या कृती दलामध्ये शासकीय स्तरावर समन्वयक म्हणून अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यदलाचे सदस्य म्हणून उपवनरक्षक (पूर्व व पश्चिम), जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक संचालक, नगररचना विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कार्यकारी अभियंता, मेरी, जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, विधी अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या टास्क फोर्समध्ये विकासकांचादेखील समावेश करण्यात आला असून, नरडोकेचे भाविक जे. ठक्कर, शंतनू देशपांडे, क्रेडाईचे रवी महाजन, किरण चव्हाण, गौरव ठक्कर यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे खाणपट्टेधारक अभिजित बनकर, सिरील रॉड्रिग्ज, सुदाम धात्रक, बाळासाहेब गांगुर्डे यांचा कृती दलात सदस्य म्हणून समावेश असणार आहे.
तर निमंत्रक म्हणून अश्विनी भट, राम खुर्दुळ, राजेश पंडित, देवचंद महाले, तन्मय टकले, दीपक जाधव यांचा समावेश कृती दलात असणार आहे. शासकीय परिपत्रकांन्वये निर्गमित केलेल्या या आदेशानुसार कृती दलात समावेश नसलेल्या परंतु पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या व्यक्तींना त्रैमासिक बैठकीत समन्वयक यांच्या पूर्वपरवानगीने उपस्थित राहण्याची मुभा देण्यात येणार आहे. गौण खनिजांबाबत वेळोवेळी आढावा घेण्यासाठी कृती दलाची बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडित सूचना, मत, किंवा माहिती द्यावयाची असल्यास tfenvironmentnsk@gmail.com संपर्क साधता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
--कोट--
शासकीय आदेशात नमूद केल्यानुसार विकासकामांसाठी गौण खनिज आवश्यक असले तरी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा डोंगररांगा, टेकड्या, जंगले, गड, किल्ले, आदी ठिकाणी पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकरिता सदर कृती दलाची निर्मिती करण्यात आली आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.
--इन्फो--
टास्क फोर्सचे धोरण
१) गौण खनिजांच्या उत्खननाबाबत धोरण निश्चिती करण्यात येणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील डोंगररांगा, गड किल्ले, संरक्षित जंगल, आदी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणच्या परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन होऊ नये म्हणून उपायोजना केली जाणार आहे.
२) कायदेशीर तरतुदीनुसार ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन अनुज्ञेय आहे अशा ठिकाणी उत्खननास मुभा देणे त्याचबरोबर पर्यावरण व विकासकामे यातील समतोल राखण्याच्या दृष्टीने व उत्खननाच्या तक्रारीसंदर्भात सारासार विचार करून निर्णय घेण्यात येणार आहेत.
३) कृती दलास योग्य वाटतील अशा बाबींवर चर्चा विनिमय करून निर्णय घेण्याची मुभा कार्यदलास असणार असून, जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची यादी करून अशा स्थळांचे संवर्धन होईल यादृष्टीने प्रयत्न करणे, तसेच जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे गड किल्ले, तसेच आदिवासी कला व सांस्कृती व त्याचा भाग असलेल्या ठिकाणांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे.
४) निसर्गाची कमीत कमी हानी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक गोष्टींचा विकासकामांसाठी वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
५) वेळोवेळी पर्यावरणविषयक अभ्यासक व तज्ञ व्यक्तींना आवश्यकतेनुसार बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे.