ब्रम्हगिरी येथील अवैध उत्खननाचा प्रकार चार दिवसांपूर्वी समोर आला होता. यापूर्वी देखील या परिसरात अवैध बांधकामाचा प्रयत्न झाला असल्याने या प्रकरणाची थेट पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेतल्याने यंत्रणेकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. येथील उत्खननप्रकरणी सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या टास्क फोर्समध्ये पर्यावरण संवर्धनासाठी नगररचना, वन विभाग, मेरी, भूमापन, पर्यावरण आदी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. या टास्क फोर्सच्या समन्वयक जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून अशासकीय सदस्य म्हणून पर्यावरण अभ्यासक, बांधकाम व्यावसायिक विकसक संघटनांचे प्रतिनिधी यांचाही समावेश केला जाणार आहे.
निसर्गसंपन्न परिसरात सुरू असलेली विकास कामे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सीमांकनाचा प्रश्न या टास्क फोर्सच्या माध्यमातून हाताळला जाणार आहे. समन्वयातून सामंजस्य करण्याचा निर्णय या माध्यमातून होणार असून पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या परिस्थितीत विविध घटकांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.