नाशिक : यंदाच्या साहित्य संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये प्रस्तावित साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यासाठी अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती स्वागत समितीची स्थापना करणार असून, त्यातून स्वागताध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
नाशिकला होणाऱ्या प्रस्तावित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दृष्टीने पुढील पावले टाकण्यास प्रारंभ झाला आहे. स्थळ निश्चितीनंतर आता संमेलनाचे स्वागताध्यक्ष निवडीसाठी निर्धारित प्रक्रियेनुसार स्वागत समिती बनविणे आवश्यक असते. त्यामुळे बुधवारी लोकहितवादी मंडळाच्या झालेल्या बैठकीत सर्वप्रथम अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. या अस्थायी समितीमध्ये लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि माजी आमदार हेमंत टकले, संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, विश्वास ठाकूर, संजय करंजकर यांचा समावेश आहे. ही समिती पूर्णपणे अस्थायी स्वरुपाची असून, या समितीद्वारे स्वागत समितीची रचना केली जाणार आहे. स्वागत समितीच्या निर्मितीनंतर अस्थायी समिती विसर्जित करण्यात येणार आहे. तसेच ही स्वागत समितीच स्वागताध्यक्ष पदासाठी नावनिश्चिती करून येत्या बुधवारपर्यंत स्वागताध्यक्ष पदावरील नावाची घोषणा करण्यात येणार आहे.