मालेगाव : तालुक्याच्या पूर्वभागातील सौंदाणेसह ११ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गिरणा उजवा कालवा पिण्याच्या पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. पाणीप्रश्न शासनाशी तीव्र लढा देण्याचा निर्धार लाभ क्षेत्रातील ग्रामस्थांनी सौंदाणे येथे झालेल्या बैठकीत केला आहे.गिरणा उजवा कालव्याला पाणी आरक्षण देण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्यानंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची सौंदाणे येथील महादेव मंदिरात बैठक झाली. बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात आलीे. अध्यक्षस्थानी नांदगावचे उपसरपंच वामन सोनवणे होते. पंचायत समिती सभापती भरत पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभाग पाणी आरक्षण देण्यास नकार देत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बैठकीत पंचायत समिती सभापती पवार, अक्षय पवार, टाकळीचे सरपंच समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, सौंदाणेचे उपसरपंच संदीप पवार आदिंनी पाणीप्रश्नी शासनाशी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभाग गिरणा- उजवा कालव्याला पाणी सोडत नसल्यामुळे व सौंदाणेंसह अकरा गावांचे पाणी आरक्षण मिळत नसल्यामुळे या भागातील पाणीप्रश्न भविष्यात पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात समितीचे अध्यक्षपदी पंकज गायकवाड, उपाध्यक्षपदी समाधान शेवाळे, संग्राम बच्छाव, संघटकपदी कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, सहसचिव नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना
By admin | Published: March 09, 2017 1:23 AM