नाशिक : विष्णुभक्त चारुदत्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकविसाव्या शतकात भौतिक सुखाच्या मागे धावणाºया समाजाने जीवनाच्या शाश्वत सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ग्रंथाचे अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.अठरा वर्षीय विष्णुभक्त चारुदत्त यांच्या काही निवडक साहित्यातून तयार करण्यात आलेल्या पहिल्याच ‘दत्ताश्रय’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.वयाच्या तेराव्या वर्षांपासून ते अठराव्या वर्षांपर्यंतच्या अवघ्या पाच वर्षांच्या कालखंडात विष्णुभक्त चारुदत्त यांनी शेकडो ग्रंथ तयार होतील इतके स्वरचित अभंग, काव्य, ओव्या घरातील भिंतींसह अन्य सर्वच साहित्यांवर लिहून ठेवल्या आहेत. घरातील फरशी, पंखा, टीव्ही, मिक्सर, कुकर, कपाट यांसह अशी एकही वस्तू घरात सापडणार नाही, की त्यावर चारुदत्त यांनी अभंग लिहिले नाहीत. त्यांच्या मातोश्री ज्योतीताई थोरात यांनी मात्र या सर्व साहित्यांचे पुनर्लेखन करून हा ठेवा जपून ठेवला आहे. त्यांनी संकलन केलेल्या काही निवडक साहित्यातूनच ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.काव्य विष्णुसदन प्रतिष्ठानच्या वतीने पेठरोडवरील कर्णनगरातील काव्यविष्णू सदनामध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी सनदी अधिकारी संजय आखाडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रा. सुनील कुटे, नगरसेवक भिकूबाई बागुल आदीसंह नागरिक उपस्थित होते.
‘दत्ताश्रया’तून उलगडले जीवनाचे शाश्वत रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:28 AM