कोरोनामुळे वर्षभरापासून सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. रोजगार-धंदे बुडाले, व्यापार-व्यवसाय मंदावला, शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस निघालेली असताना जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी यातच संधी शोधली. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या मास्कची कमतरता, काळ्याबाजारातून होणारी विक्री व त्यातून नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी गावोगावच्या महिला बचत गटांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामपंचायती तसेच ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कच्च्या मालासाठी पैसेही उपलब्ध करून देण्यात येऊन गावोगावच्या महिलांनी ‘मास्क’च्या निमित्ताने एकत्र येऊन संकटाचा आर्थिक व सामाजिक पातळीवर मुकाबला केला. २५३ महिला बचत गटांनी साडेचार लाख मास्कची निर्मिती अवघ्या दोन महिन्यात करून त्यापासून ४४ लाख रूपयांचे उत्पन्न कमाविले. यातून महिलांचा आत्मविश्वास तर वाढलाच परंतु कोरोना काळात दोन वेळची भ्रांत पडलेल्या कुटुंबाला आर्थिक आधारही मिळाला.
----------------------
ग्रामीण रूग्णसेवेला मिळाली बळकटी
नाशिक : महिलांची प्रसूती व रूग्णांवर प्राथमिक उपचारापुरते मर्यादित असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचा कायापालट होण्यास ‘कोरोना’ कारणीभूत ठरला असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
मार्च महिन्यात कोरोनाने देशभरात शिरकाव केला, तोपर्यंत कोरोना म्हणजे नेमके काय, त्याच्यावर उपचार कोणते, त्याच्याशी दोन हात करायचे म्हणजे काय करायचे याची कोणतीही पुसटशी कल्पना नसलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मात्र कोरोनाचा गेल्या वर्षभरापासून यशस्वीपणे मुकाबला कायम ठेवला आहे. ग्रामीण भागात पहिला रूग्ण सापडल्यानंतर भांबावलेल्या यंत्रणेने धीराने परिस्थितीला सामोरे जात उपलब्ध तुटपुंजा साधन-सामग्रीवर संकटाला तोंड दिले. या निमित्ताने संपूर्ण ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला कोरोना आजार, त्यावरील उपचार, उपाययोजना, घ्यावयाची काळजी याचे प्रशिक्षण देण्यात आले तर भौतिक दृष्ट्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालयांमध्ये साधन सामग्रीची उपलब्धता झाली. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरवठा असलेल्या खाटा तालुका तालुक्यात नव्याने उभ्या करण्यात आल्या तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वच प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. रूग्णाची तपासणी व उपचाराची सोय स्थानिक पातळीवरच झाल्यामुळे शहरी ग्रामीण भागाच्या आरोग्यावर पडणारा ताण कमी होण्यास मदत तर झालीच परंतु ग्रामीण भाागातच उपचाराची सोय करण्यात येणार असल्यामुळे वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या आरोग्य खात्यातील अनेक पदांची भरती झाली. त्यामुळे कोरोनाने कधीही न भरून येणारी हानी झाली असली तरी, आरोग्य व्यवस्थेची वर्षानुवर्षे असलेली दुरवस्था दूर कमी करण्याकामी कोरोना कामी आला.
---------------------------
वर्ष उलटले तरी, कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. या संकटावर मात करण्यासाठी लागणारे धैर्य, प्रयत्न व जागरूकता महत्त्वाची होती. ती सर्व अधिकारी, पदाधिकारी व जनतेने पावलोपावली दाखविली. त्यातून आपण या महामारीचा सामना करीत आहोत. या संकटातून आपण निश्चित बाहेर पडू.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी
-------------------------
(कोरोना विशेष पानासाठी)