नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले. त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल विचारून जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन तरी काय करायचे, असे म्हणत साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ४) नाशिक दौऱ्यावर येत असून, ते साहित्य संमेलनास उपस्थित राहतील किंवा नाही याविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे. स्वत: स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिल्याचे घोषित केले आहे. तरीदेखील ग्रंथ दिंडीत भाजपचे महापौर सतीश कुलकर्णी वगळता भाजपच्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर येणारे फडणवीस तरी भेट देतात काय, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागून असताना फडणवीस यांनी सोशल माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?
नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीसुद्धा असून, अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत. मात्र, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, त्याचे आपण स्वागतच करीत असल्याचे सांगून फडणवीस यांनी म्हटले आहे की, पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनीयांची उंची आपण कमी करीत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच; परंतु जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असे सांगून नाशिक दौऱ्यावर आलेेले फडणवीस यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरविली आहे.