पाथरे (बाळासाहेब कुमावत) : संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र. मात्र त्याच्या जाण्यानंतरही कुटुंबाची काळजी वाहते, ती मैत्रीतली माणुसकी. हाच मित्रभाव जपत सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील मित्रांनी माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. कोरोनाच्या आजाराने गमावलेल्या पशुवैद्यक मित्राच्या कुटुंबीयांना दीड लाखाची मदत करून आदर्श ठेवला आहे.
पाथरे येथील तरुण पशुवैद्यक योगेश सोनवणे याचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या सोनवणे कुटुंबाच्या मदतीला धावली ती मैत्री…! मित्रांनी दीड लाखाची मदत उभी करून दिल्याने हे कुटुंबीय गहिवरले.
कोरोना काळात अनेकांनी नातेवाईक, मित्रपरिवार गमावला आहे. अनेकांची कुटुंबे या काळात उद्ध्वस्त झाली. अनेकांची स्वप्ने भंगली. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गमावल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाने होत्याचे नव्हते करून टाकले. परंतु अनेक सामाजिक संघटना, मित्रपरिवार, सेलिब्रिटी यावेळी अशा परिवाराला मदत करत आहे. अशाच एका मित्राच्या कुटुंबाला पाथरे येथील मित्रांनी १,५३,४३३/- (एक लाख त्रेपन्न हजार चारशे तेहतीस) रुपये इतकी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
येथील पशुवैद्यक योगेश कचरू सोनवणे ( वय ३७) याचे कोरोनाने एक महिन्यापूर्वी निधन झाले. योगेश हा व्यवसायाने पशुवैद्यक असल्याने त्याचे गावातील तसेच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. पशुसेवा करता करता कोरोनाबाधित झाल्यानंतर पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देत योगेश शेवटी या जगातून निघून गेला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने कुटुंबाला सावरले होते. मामा बाबासाहेब गवळी, शिवाजी गवळी यांनी आपल्या बहिणीला तिच्या लग्नानंतर आधार दिला. योगेश हा पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील यांच्यासह पाथरे येथे राहत होता.
--------------------
रक्कम मुलीच्या नावे
ही रक्कम मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेत ठेवणार असल्याचे योगेशच्या वडिलांनी सांगितले. अडचणींच्या काळात मित्रांना मदत करणाऱ्या योगेशच्या अचानक जाण्याने सामाजिक जाणीव ठेवत मित्रपरिवारानेही आर्थिक मदत केल्याचे समाधान व्यक्त होत आहे. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो, त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो, हेच यानिमित्ताने सिद्ध झाले.
(०१ योगेश सोनवणे)
===Photopath===
010621\01nsk_16_01062021_13.jpg
===Caption===
०१ योगेश सोनवणे