वरखेडा : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, लॉकडाउन सुरू असल्याने कोंबड्यांसाठी खाद्य व औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.दिंडोरीच्या पश्चिम आदिवासी भागात अनेकांनी बँकांचे कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना खाद्य पोहचत नसल्याने, उपासमारीने मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत पावतआहेत.प्रशासनाने पशुखाद्य पोहच करण्यासाठी परवानगी दिली असली तरी वाहनधारक भीतीपोटी वाहतूक करत नसल्याने खाद्य मिळत नाही. त्याशिवाय लॉकडाउनमुळे गेल्या पंचवीस दिवसांपासून पशुवैद्यकीय डॉक्टरही पोल्ट्रीवर येत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागत आहे. पोल्ट्री व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक बॅचला साडेसात हजार पक्षांसाठी ४० ते ४५ हजार रुपये भांडवल लागते. मात्र अशा परिस्थिती पोल्ट्रीधारकांना खर्च झालेले भांडवल व बँकांचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न पडलेला आहे.ज्या पोल्ट्री कंपन्यांनी करार करून पक्षी पुरविले आहेत अशा सर्व कंपन्यांनी पोल्ट्रीधारकांना आधार देऊन व प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी अपेक्षा सदाशिव गावीत यांनी व्यक्त केली.पोल्ट्री फार्ममध्ये आज अखेर एकूण अंदाजे साडेसहा हजार कोंबड्या आहेत. साधारण ४७ दिवसांचे पक्षी आहेत. एवढ्या पक्ष्यांना दररोज ११ क्विंटल खाद्य द्यावे लागते. मात्र खाद्य प्रमाण कमी असल्याने फक्त पाच गोण्या म्हणजे अडीच क्विंटल खाद्य द्यावे लागते. त्यामुळे वजनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, उपासमारीने कोंबड्या मृत पावत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. - सदाशिव गावित, पोल्ट्री व्यावसायिक
कोंबड्यांनाही खाद्य मिळेना; पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:14 PM