खमताणे : दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावपातळीवरील वातावरणात थंडीतही उष्मा वाढू लागला आहे. कोरोना काळातील मुदत संपलेल्या अनेक सहकारी संस्था, पंचायत राज संस्थांमधील निवडणुकांना स्थगिती घेऊन प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गावपातळीवरील ग्रामपंचायतींमधील हौशे, नवशे, पुढाऱ्यांना एक वर्षभर पदाशिवाय राहावे लागले. त्यामुळे सध्या अनेकांना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच पदाचे डोहाळे लागले होते. कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने गावपातळीवरील निवडणुका जाहीर करण्यात आल्या. निवडणुका जाहीर होताच नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला. जो तो निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. अनेक गावांमध्ये सध्या कोरोनाची भीती न बाळगता गटागटांनी नागरिक निवडणुकीविषयी मोर्चेबांधणी करण्यात मग्न झाले आहेत. त्यामुळे वॉर्डातील मतदारांना विवाह, साखरपुडा समारंभात खास आमंत्रण दिले जात आहे. या निवडणुकीत तरुणार्ई मोठ्या प्रमाणात भाग घेताना दिसत आहे. अर्थात त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगतही येण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक गावांमध्ये विविध ग्रुपकडून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र प्रत्येकाला ग्रामपंचायत सदस्य होण्याची प्रबळ इच्छा असल्याने बिनविरोध निवडणुकांना तरुणाईचा विरोध आहेे. जे काही होईल ते निवडणुकीतच होऊन जाऊ द्या, असा सुर तरुणाईकडून ऐकायला मिळत आहे. अनेक युवक आता निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने थंडीच्या दिवसांतही ग्रामीण भागातील वातावरण गरम होऊ लागले आहे.