नाशिक : मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेखील निखिल गुरुवारी सायंकाळी ‘लगेच येतो...’ असे सांगून घराबाहेर पडला तो कायमचा न येण्यासाठी...सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील बळवंतनगरमधील एका सोसायटीच्या सदनिकेत निखीलने रात्रीच्या सुमारास गळफास घेत मृत्यूला कवटाळल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पंचवटीतील हिरावाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्य देशमुख यांचा एकुलता एक मुलगा निखील प्रकाश देशमुख (३०) हा व्यवसाय करत होता.कारखान्यापासून जवळच कुटुंबीयांनी त्यास सदनिका घेऊन दिली होती. त्याचा विवाह शहरातील एका प्रतिष्ठित अशा कुटुंबातील कन्येशी होणार होता. निखील गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर पडला. रात्री १० वाजेपर्यंत त्याचा भ्रमणध्वनी सुरू होता; मात्र त्यानंतर भ्रमणध्वनी बंद झाल्याचे कुटुंबीयांनी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना निखीलचा मृत्यू झाल्याचे समजले अन् आनंदोत्सव शोकसागरात बुडाला.शुक्रवारी हळद आटोपून शनिवारी मंगलाष्टके होणार होती. कटुंबीयांनी विवाहाची जय्यत तयारी केली. कुटुंबातील आबालवृद्ध आनंदोत्सव साजर करत होते. नववधू-वरावर अक्षता टाकत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्याचा मुहूर्त येण्याअगोदरच निखीलने आपले आयुष्य संपविल्याने दोन्ही कुटुंबांवर आभाळ फाटले. निखीलच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शोकाकू ल वातावरणात अंत्यसंस्कारऐन हळदीच्या दिवशी शुक्रवारी (दि.१९) निखीलच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वधू-वरपित्याचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.निखीलच्या मातोश्री व बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला होता. निखीलच्या अशा मंगलमयी क्षणाच्या तोंडावर अचानक झालेल्या मृत्यूने देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय हादरले असून, त्या दु:खातून ते अद्यापही सावरलेले नाहीत.‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही...’निखीलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी त्याने ‘मी आयुष्यात काही करू शकलो नाही म्हणून जीवन संपवित आहे’ असा मजकूर असलेली चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच ‘त्याने’ मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:50 PM