नाशिक : कुणी ७ वर्षाचं, कुणी १२, कुणी ९ तर कुणी अवघ्या ४ वर्षांचे बालक. जिल्ह्यातील अशा तब्बल २७४ बालकांचे बालपण कोरोनाने अचानक करपून गेले आहे. वडिलांची छत्रछाया अचानक डोक्यावरून नाहीशी झाली असल्याने अजाण वयातच या बालकांमध्ये प्राैढत्व आले आहे. वडिलांचा आधार गमावला असला, ते पुन्हा दिसणार नसले तरी त्या वडिलांनी त्यांच्याबाबत बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार ही बालके निश्चितच करतील; मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील प्रत्येकाने त्यांच्या मायेचे छत्र शक्य त्या प्रकारे या बालकांवर धरण्याची गरज आहे.
या भावनेतूनच नाशिकमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्यास प्रारंभ केला आहे. नाशिकमध्ये भारतीय जैन संघटना, नवचेतना यांसह अन्य काही सामाजिक संस्थांनी पालक गमावलेल्या बालकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहेे. विशेषत्वे कमावता घटक असलेले वडील गमावलेल्या बालकांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यात एकूण १४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून, १ ते १८ वयोगटातील एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. त्या २८९ पालकांमधील २७४ बालकांना पितृशोक तर १५ बालकांना मातृशोक सहन करावा लागला. आई गमावणे हे सर्वात मोठे दु:ख असते; मात्र वडील असताना त्यांच्या असण्याचे महत्त्व कळत नसले तरी ते नसल्यावर पदोपदी जाणवते. ती उणीव कुणी भरुन काढू शकत नाही. कुटुंबाचा आर्थिक कणा असलेले वडील गमावणाऱ्या बालकांची संख्या खूप अधिक असल्याने अशा बालकांना खऱ्या अर्थाने आधाराची नितांत गरज आहे.
इन्फो
कुटुंबाच्या चरितार्थासाठी गेला जीव
घराबाहेर कोरोनारूपी राक्षसाशी सामना करावा लागणार, हे माहिती असतानाही केवळ कुटुंबाचा चरितार्थ चालावा, आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणूनच त्यातील बहुतांश वडिलांना घराबाहेर पडावे लागले होते. या २७४ वडिलांमधील बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय गटातील आहेत.
-------------
पितृ दिन विशेष