नाशिक : शहरातून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्त्यांना मद्यविक्रीचे निर्बंध लागू राहणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर शासनाच्या आदेशाची वाट न पाहता शहरातील काही हॉटेल्स व बिअरबारचालकांनी आपल्या अधिकारातच मद्यविक्रीला सुरुवात केली आहे. काही दुकानदारांनी न्यायालयाच्या निर्णयाचे फटाके वाजवून स्वागत केले असून, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र या साºया प्रकाराबाबत अनभिज्ञ आहे. न्यायालयाच्या या निकालाची प्रत सोशल माध्यमांवर झपाट्याने उपलब्ध झाल्याने त्याचा आधार घेत मद्यविक्रेत्यांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत शासनाचे स्वतंत्र आदेश निर्गमित होण्याची शक्यता असून, तसा आदेश अद्याप निघालेला नाही. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अद्यापही संभ्रमात आहे. दुसरीकडे नागपूर खंडपीठात मद्यविक्रेत्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने मंगळवारी यासंदर्भात आपली भूमिका मांडण्याची तयारी दर्शविली आहे. अशा स्थितीत काही दुकाने सुरू झाली आहेत.
आदेश येण्यापूर्वीच शहरात मद्यविक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:53 AM