नाशिक : पक्षाची उमेदवारी देण्यासाठी दोन लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसची ध्वनिचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल होऊन उडालेली खळबळ शांत होत नाही तोच, भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षानेदेखील दहा लाख रुपये देऊनही पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप करणारी नवीन ध्वनिचित्रफीत व्हायरल झाल्याने भाजपाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे दोन लाख रुपये पक्ष निधीसाठी मागितल्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदारासमक्षच हा आरोप झाल्याने आता त्याचे समर्थन कसे करावे? असा प्रश्न भाजपासमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे व्हिडीओत आरोप करणारे गोपाळ पाटील यांनी मात्र इन्कार केला असून, मनसेच्या नेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.भाजपाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयातच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहर सरचिटणीस नाना शिलेदार यांनी एका इच्छुकाकडे उमेदवारी हवी असेल तर दोन लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनिचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाली होती. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने उमेदवारी वाटप करताना बाजार मांडल्याची सर्वत्र टीका होऊ लागल्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र या पैसे मागण्याच्या कृतीचे समर्थन केले व सदरचे पैसे उमेदवारांच्या प्रचारासाठीच गोळा केले जात असल्याचे सांगितले होते. प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये अधिकृत घेतले गेल्याचे त्यांचे म्हणणे होते. अर्थातच त्यांच्या या समर्थनाशी कोणी सहमत नसले तरी, भाजपाची उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले गेल्याच्या होणाऱ्या आरोपांना पृष्ठी देणारी दुसरी ध्वनीचित्रफित सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने भाजपासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.
दहा लाख देऊनही भाजपाकडून उमेदवारी नाही
By admin | Published: February 06, 2017 12:30 AM