नाशिक : वसंत व्याख्यानमालेचे तीन लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर बेमुदत उपोषण करणारे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिका आयुक्त किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाशिवायच आंदोलन गुंडाळले आहे.व्याख्यानमालेला अनुदान मंजूर करूनही ते आयुक्त देत नसल्याच्या कारणाने बेणी यांनी राजीव गांधी भवनासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र व्याख्यानमालेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याने धर्मदाय आयुक्तांकडे दावे दाखल असून, त्यामुळेच डॉ. प्रवीण गेडाम आणि तुकाराम मुंढे या दोन माजी आयुक्तांनी गेल्यावर्षी अनुदान नाकारले होते. विद्यमान आयुक्त गमे यांनीदेखील हीच भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.९) पासून बेणी यांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र आयुक्त गमे यांनी तरीही ठोस आश्वासन दिलेच नाही आणि आचारसंहितेत ते मिळणे शक्य नसल्याने बेणी यांनी सांगून उपोषण मागे घेतले, मात्र दुसरीकडे आचारसंहितेपूर्वीच अनुदान मंजूर असल्याने ते मिळालेच पाहिजे, त्यामुळे आयुक्तांवर कार्यालयीन वेळेत एसएमएसचा मारा करावा, असे आवाहन बेणी यांनी केले आहे. दुसरीकडे रमेश जुन्नरे यांनी व्याख्यानमाला गंगाघाटावर असताना व्याख्यानमालेला महापालिकेने भलतीकडेच भूखंड दिल्याने त्याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
आश्वासन न मिळताही बेणी यांचे उपोषण समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:19 AM