इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली जात असून, या मार्गावरून धावणारी वाहने, हातगाड्यांचे अतिक्रमण पाहता पायी चालनेही मुश्किल झाले आहे.जॉगिंग ट्रॅक ते चार्वाक चौक हा गजानन महाराज रस्ता इंदिरानगरमधील जुना व मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगत शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, कमोदनगर, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, महारुद्र कॉलनी यांसह विविध कॉलनी व सोसायट्या आहेत त्यामुळे व विविध उपनगरांत जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. परंतु सायंकाळी सहा वाजेनंतर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर या रस्त्यादरम्यान भाजी व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहात असल्याने व त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर सर्रासपणे उभे करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.सुमारे पंधरा वर्षांपासून सदरच्या रस्ता रुंदीकरणाची मागणी केली जात होती. अखेर दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु या मोकळ्या रस्त्यावर विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक येत नसल्याने विक्रे त्यांचे चांगलेच फावत आहे.
सायंकाळ होताच रस्ता होतो ब्लॉक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:45 PM