झोडगे : संपूर्ण पॅनलला बहुमत मिळाल्याने आणि सर्वजण सरपंचपदाची स्वप्नं पाहात असतानाच दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाच्या निवडीवेळी उमेदवार निश्चिती होऊ न शकल्याने चार दिवस उशिराने झालेली जळकू सरपंचपदाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली.
सरपंचपदी मालेगाव बाजार समितीचे संचालक अमोल शिंदे यांच्या भावजय आसावरी शिंदे यांची तर उपसरपंचपदी काशिनाथ उशिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेख यांनी काम पाहिले. यावेळी झेंडू बा महाराज पॅनलचे निवडून आलेले सदस्य शिवाजी पवार, यशोदा सोनवणे, चंपाबाई सरडन व जगन्नाथ लाठर, ताराबाई पवार, सविता माळी, मोतीराम सोनवणे, आसावरी शिंदे आदी उपस्थित होते. गाव विकासासाठी सर्व मतभेद विसरून सर्वांना सोबत घेत ग्रामविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी सरपंच आसावरी शिंदे यांनी दिले. झेंडू बा महाराज पॅनल व राधा माता पॅनल यांच्यात सरळ लढत होऊन झेंडू बा महाराज पॅनलने नऊच्या नऊ जागांवर विजय मिळवला होता. दशरथ उशिरे, पूनमचंद दराखा, अशोक शिंदे, दयाराम शिंदे, श्रावण बागुल, शांताराम शिंदे, दिलीप शिंदे, माजी सरपंच गोरख पवार, प्रवीण पगार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील आदींनी सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.